दाखल्यात गंभीर चुका ; शाळा प्रशासनावर आरोप
खोपोलीतील प्राथमिक शाळा क्र. 13 मध्ये चुकीची जन्मतारीख, चुकीचे जन्मस्थळ नोंद
* चुका दुरुस्त न करता पालकांना कामाला लावले जाते - पालकांचा आरोप
खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगरपालिकेने दिलेल्या मूळ जन्मदाखल्याऐवजी चुकीचे हॉस्पिटल सर्टिफिकेट लावून बालवाडीपासून पुढील शाळेपर्यंत विद्यार्थ्याच्या जन्मतारीख व जन्मस्थळात गंभीर चुका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चुकीमुळे वर्षानुवर्षे पालकांची दिशाभूल होत असून शालेय प्रशासनाकडून दुरुस्ती नाकारल्यामुळे पालकांमध्ये संताप वाढला आहे.
* प्रकरण काय ? :- मुतस्कीम युनूस धतुरे (वय 37, राहणार हाळ खुर्द) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा खरा जन्मदिनांक 14/09/1989 व जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली असा आहे. परंतु बालवाडी सेविकेने मूळ जन्मदाखला न लावता ‘माहेर हॉस्पिटलचे दुसऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र’ जोडले, ज्यात आईचे चुकीचे नाव लतीफा मोहम्मद सईद धतुरे, चुकीची जन्मतारीख 11 / 08/ 1988, चुकीची जन्मवेळ 4.20 असे नमूद होते. हीच चुकीची माहिती पुढे युसुफ मेहर अली उर्दू प्राथमिक शाळा क्र. 13 मध्येही नोंदली गेली. विशेष म्हणजे शाळेने विद्यार्थ्याचे जन्मस्थळही चुकीचे लोणावळा पुणे असे नोंदवले आहे.
* शाळा प्रशासन दुरुस्ती टाळत असल्याचा आरोप :- धतुरे यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांना दुरुस्ती करण्याची विनंती केली असता, ही चूक आधीच्या मुख्याध्यापकांनी केली आहे, आम्ही दुरुस्ती करू शकत नाही, तुम्ही गॅझेट करा, असे उत्तर दिले. दुरुस्तीसाठी कोणताही शासन आदेश नसल्याचेही सांगण्यात आले. यावरून पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, चुका शाळेने केल्या…आणि फेऱ्या पालकांच्या का ? पगार शाळा व शिक्षकाला…त्रास विद्यार्थ्यांना का ?
* पालकांचा शपथपत्राद्वारे दावा :- पालकांनी शपथपत्रावर स्पष्ट नोंदवले आहे की, जन्मदिनांक 14/09/1989 व वेळ 6.20, तर आईचे नाव नूरजहाँ युनूस धतुरे, वडिलांचे नाव युनूस इस्माईल धतुरे, जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली हेच बरोबर आहे. पालकांनी योग्य माहितीचे पुरावे जोडून शालेय दाखल्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
* बर्याच विद्यार्थ्यांचे दाखले चुकीचे असल्याची माहिती :- या शाळेतून असे अनेक चुकीचे जन्मदाखले दिल्याचेही स्थानिकांकडून समोर येत आहे. यामुळे पुढील प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, पासपोर्ट, आधार-पॅन लिंकिंग यासह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गंभीर अडचणी येऊ शकतात.
* प्रशासनाकडून तपासाची मागणी :- स्थानिक नागरिकांनी शाळेतील दाखला प्रक्रिया, जन्मदाखल्यांची नोंद, बालवाडी ते प्राथमिक शाळा दस्तऐवज पडताळणी यावर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे.







